नवीन पनवेलमध्ये अत्रे कट्ट्यावर आभाळमाया

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

येथील आचार्य अत्रे कट्टा या रसिक परिवाराच्या वतीने आभाळमाया हा निवेदन व गायनावर आधारीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाट्यदिग्दर्शिका वैशाली केतकर यांच्या संकल्पनेतील नवीन पनवेल, सेक्टर 10, येथील सिडको उद्यानामध्ये झालेल्या कार्यक्रमाला रसिक पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्त्री आयुष्यात अनेक भूमिकांमधून जात असते. नाते संबधांना तिच्या आयुष्यात महत्वाचं स्थान आहे असे कथन करत तिचे माहेर, सासर अशा दोन्हीकडील विविध नात्यांचा भावबंध वैशाली केतकर यानी आपल्या भावपूर्ण निवेदनामधे अचूक शब्दात गुंफला. इतर नाती जपताना स्वतःशीही नाते जोडावे, आपले छंद व आवड जोपासावी असा संदेशही दिला.

प्रसिद्ध गायिका शोभा पराडे यानी या नात्यांचा भावबंध प्रकट करणारी गाणी सादर केली. ‘आई अमोल माया, घाल घाल पिंगा, आभाळमाया, येणार नाथ आता, एकाच या जन्मी जणू’ अशी विविध गाणी सादर करून ‘आनंदाचे डोही’ या अभंगांने कार्यक्रमाची सांगता केली. यशवंत केळकर यांनी संवादिनी व योगेश गायकवाड यानी तबलासाथ केली. संपदा बेहरे यांनी परिचय करून दिला.

सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण व्हावी हा अत्रे कट्ट्याचा प्रमुख उद्देश असून मनातील सुप्त भावना व्यक्त करणारे हे एक मुक्त व्यासपीठ आहे. अशी प्रतिक्रिया अत्रे कट्ट्याचे अरविंद कर्पे यांनी व्यक्त केली.

Exit mobile version