| पुणे | प्रतिनिधी |
हैद्राबाद येथे पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये पुण्याच्या पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली. अभिजीतच्या विजयामुळे यंदाची मानाची हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे आली आहे. अभिजीतने हरियाणाच्या पैलवानाला चितपट केलं. भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची समजल्या जाणार्या हिंद केसरी स्पर्धेत पुण्याच्या पैलवानने बाजी मारल्याने पुण्यात जल्लोष करण्यात आला. या हिंद केसरी स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळवण्यात आला. या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजीत कटकेने हरियाणाच्या सोमवीरला मात दिली. अभिजीतने सोमवीर याला 4-0 अशा फरकाने पराभूत केलं.
अभिजीत कटकेने 2017 सालचा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. तसेच अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे. या विजयानंतर अभिजीतवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी ट्विट करत त्याला शुभच्छा दिल्या आहेत. त्यांनी वा रे… पठ्ठ्या ! आपल्या वाघोलीचे सुपुत्र पैलवान अभिजित कटके हिंद केसरी किताबाचे मानकरी ठरले. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिजीतचा मैदानी प्रवास
अभिजीत हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान. पैलवान चंद्रकांत उर्फ तात्या कटके यांचा हा मुलगा. अभिजीतच्या रूपाने त्यांच्या घरातील पाचवी पिढी कुस्तीत आहे. अमर निंबाळकर, भरत म्हस्के, हणमंत गायकवाड, गुलाब पटेल यांचे त्याला मार्गदर्शन लाभते. अभिजितने 2015मध्ये ङ्गयुवा महाराष्ट्र केसरीफचा मान मिळवला. त्यानंतर 2016मध्ये त्याने ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले. ताकदीला कल्पकतेची जोड देत कुस्त्या जिंकण्याचा अभिजीतचा ङ्गडावफ काही काळापासून कमालीचा यशस्वी ठरत आहे. युवा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद दोन्ही किताब मिळवणार्या दीनानाथ सिंह, दादुमामा चौगुले, हरिश्चंद्र बिराजदार, विनोद चौगुले व अमोल बुचडे यांच्या रांगेत विराजमान होण्याचा बहुमान अभिजीतने मिळवला आहे.
दरम्यान, भारतीय पारंपरिक शैली कुस्ती संघटनेच्या माध्यमातून होणार्या या स्पर्धेतील अभिजीत पुण्याचा दुसरा हिंद केसरी ठरला. यापूर्वी हा मान योगेश दोडकेने मिळवला होता. त्याचबरोबर एक वर्ष मॅटवर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत पुण्याच्याच अमोल बराटेने हिंद केसरीचा मान मिळवला होता.