| रत्नागिरी | प्रतिनिधी |
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपनंतर शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार आणि शरद पवार गट, शिवसेना यांच्याकडून निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. यादरम्यान कोकणातून पदवीधर निवडणुकीसाठी मनसे उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांच्या शर्यतीत मनसेकडून अभिजीत पानसे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अभिजीत पानसे यांचे शिक्षणक्षेत्रात चांगला अभ्यास असून त्यांनी यापूर्वी शाळेतील अनेक समस्या मांडल्या आहेत. अभिजीत पानसे यांनी कोकानात पदवीधर निवडणुकी संदर्भात कोकण, उल्हासनगर, ठाणे भागात बैठक घेतल्या आहेत. कोकण पदवीधर निवडणुकीत भाजप, ठाकरे गट आणि मनसेत लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कोकणचा दौरा केला होता. त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भेटींसाठी खळा बैठका घेतल्या होत्या. यावेळी त्यांनी आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका घेतल्याने याचा आगामी निवडणूकीवर काय परिणाम होईल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.