महाराष्ट्रातही कंत्राटी कामगार पद्धत रद्द करा; ठाणे शेकापची मागणी

| ठाणे | प्रतिनिधी |

ओडिशामध्ये कंत्राटी कामगार पद्धत रद्दबाबत ठराव झाला असा निर्णयाचा ठराव महाराष्ट्र सरकारने घ्यावा, अशी मागणी ठाणे जिल्हा शेकापने राज्य सरकारकडे केली आहे.

या संदर्भात शेकापचे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ओडिशा राज्यातील नवीन पटनायक यांच्या सरकारने कामगारांच्या हिताचा अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आस्थापनांना कामगार भरती करताना कामगारांना कायम कामगार म्हणूनच भरती करावी लागणार आहे. ज्यामुळे कामगाराची कंत्राटी कामगार पद्धतीच्या जाचातून सुटका होणार आहे. या निर्णयामुळे ओडिशा राज्यातील 57,000 हून अधिक कामगारांना कायम करुन घेण्यात येणार आहे. असे या निवेदनातून सुचित केले आहे.

मुळातच कायम स्वरुपाचे काम करत असलेल्या कामगाराला 240 दिवस काम केल्यावर कायम कामगार म्हणून सामील करुन घ्यावे असा कायदा आहे. परंतु सर्व आस्थापना आपल्या सोयीनुसार कामगारांना 240 दिवस पूर्ण होण्याआधी सर्व्हिस ब्रेक देतात व कायद्याला बगल देतात.

आपल्या राज्यातही कंत्राटी कामगार पद्धतीच्या आड कामगारांची पिळवणूक होत आहे. असे साळवी यांनी निवेदनातून निदर्शनास आणले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या निर्णयाचा विचार करुन आपल्या राज्यातील कंत्राटी पद्धत काढून मोठ्या संख्येने असलेल्या कंत्राटी कामगारांना दिलासा द्यावा. जेणेकरुन या कामगारांना देखील कायम कामगारांप्रमाणे सोयी-सुविधांचा लाभ घेता येईल. अशी अपेक्षाही साळवी यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version