वन जमिनींचा शेरा रद्द करा

रोहा तालुक्यातील शेतकर्‍यांची मागणी
। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतजमीन मिळकतीच्या सातबारा उतार्‍यावर महाराष्ट्र शासन राखीव वने तसेच वने असे शेरे आहेत. हे शेतकर्‍यांच्या जमिनींवर नाहक लागलेले शेरे कमी करून मिळावेत, अशी मागणी रोहा शेतकरी सभेच्या तक्रार निवारण मंचाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. यासाठी खा.सुनील तटकरे यांना धानकावे येथे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी तक्रार निवारण मंचाचे सचिव जगदीश जाधव, विश्‍वनाथ जाधव, मनोज कान्हेकर, संदेश गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

रोहा तालुक्यातील लागवडीखालील क्षेत्र व इतर पिकाखालील जमिनीवर महाराष्ट्र शासन राखीव वने तसेच वने असे लागलेले शिक्के आणि शेरे अतिशय चुकीचे असून कोणत्याही प्रकारची शहानिशा किंवा प्रत्यक्ष पाहणी व वनक्षेत्र नसताना जाणून-बुजून लावले गेले आहेत. शासनाने कूळ कायद्यानुसार राहील त्याचे घर व कसेल त्याची शेती यानुसार शेतकर्‍यांना जमिनी दिल्या. या कुळ कायदाप्राप्त जमिनीचे हप्तेही शेतकर्‍यानी भरले. असे असताना तत्कालीन सरकारने 1975 साली खासगी वनसंपदा कायदा आणून कुळ कायद्यानुसार ज्यांना जमिनी मिळाल्या, त्यातील बर्‍याचशा जमिनींवर महाराष्ट्र शासन राखीव वने असे शेरे मारून तालुक्यातील शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे काम केले.

याबाबत तालुक्यातील शेतकरी सभा व तक्रार निवारण मंचाचे सचिव जगदीश जाधव शेतकर्‍यांना न्याय मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या काम करण्याच्या तळमळीमुळे तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. आता शेतकरी राजा जागा झाला आहे. फुकट जमिनी बळकावून देणार नाही. शेतकर्‍यांच्या जमिनींवर नाहक टाकलेले वन शेरे शेतकर्‍यांची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे हे नाहक लागलेले शेरे लवकरात लवकर काढावेत, यासाठी तक्रार निवारण मंच आक्रमक झाले आहे.

खासगी वनसंपदा कायद्यानुसार 12 हेक्टरपेक्षा कमी जागेला वने हा शिक्का लावता येत नाही. तसेच वन हा शेरा मारताना लागवडीखालील क्षेत्र वगळणे बंधनकारक आहे. तसेच कमी क्षेत्राला वने लावता येत नाही. असे असताना वनविभागाचे सर्व्हेअर तसेच महसूल विभागातील तहसीलदार, सर्कल, तलाठी यांनी कोणतीही खातरजमा व शहानिशा न करता लागवडीखालील भात शेती व कमी क्षेत्राला वनांचे शिक्के मारून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. परिणामी, शेतकर्‍यांवरील अन्याय दूर करून शेतकर्‍यांचे सातबारे कोरे करावेत, अशी मागणी शेतकरी सभा तक्रार निवारण मंचकडून होत आहे.

भातशेतीला लागलेले वने शेरे यासंदर्भात लोकप्रतिनिधी संसदेत शेतकर्‍यांचा प्रश्‍न मांडतील आणि न्याय मिळवून देतील, अशी आशा रोहा तालुक्यातील शेतकर्‍यांना आहे.

जगदीश जाधव, सचिव, शेतकरी तक्रार निवारण मंच


Exit mobile version