विरोधकांना फुटला घाम; जिल्ह्यातील समस्यांबाबत आ. जयंत पाटील आक्रमक

| मुंबई | प्रतिनिधी |
रायगडच्या मुलभूत समस्यांबाबत आ.जयंत पाटील यांनी बुधवारी (दि.26) विधानपरिषदेत वाचा फोडून सरकारचे लक्ष वेधले. यामध्ये प्रामुख्याने देवळांची सुरक्षा, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, कर्मचारी या समस्यांबरोबरच खोटी बिले काढून सरकारी पैशांची लुटमार करणाऱ्या लोकप्रतिनिधी,अधिकारी यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी कोकणातील देव,देवतांचे संरक्षण करण्याची मागणी केली.

विधानपरिषदेत आ.जयंत पाटील यांनी चौल येथील दत्त मंदिरात झालेल्या चोरीचा मुद्दा उपस्थित केला.या चोरीला आता सात,आठ महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्यापही त्याचा तपास करण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.चौल येथील दत्त मंदिर हे समस्त अलिबाग तालुक्याचे श्रद्धास्थान आहे.या मंदिरात 16 डिसेंबर 2022 रोजी चोरी झालेली आहे.मंदिरातील 4किलो वजनाची चांदीची मूर्ती या चोरट्यांनी चोरुन नेली.चोरी करत असताना चोरटे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतात असे असूनही पोलीस यंत्रणेला त्यांचा माग काढण्यात अपयश आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.कोकणातील सर्वच मंदिरांमध्ये अशा चोरीच्या घटना घडत आहेत.हा एक व्यवसायच झाल्याचेही त्यांनी खेदाने नमूद करताना सर्व मंदिरांमध्ये योग्य ती सुरक्षा पुरविली जावी,अशी आग्रही मागणीही जयंत पाटील यांनी केली.

समाजमंदिरासाठी खोटी बिले
आ.जयंत पाटील यांनी रेवदंडा येथे सुस्थितीत असलेल्या आणि त्यांच्याच विकासनिधीतून बांधण्यात आलेल्या भंडारी समाजाच्या समाजमंदिराचा मुद्दा उपस्थित केला. या समाजमंदिराच्या उभारणीसाठी पुन्हा 40 लाख रुपयांचे नवे अंदाजपत्रक का बनविण्यात आले? अशी संतप्त विचारणाही त्यांनी सभागृहात केली. हे समाजमंदिर बांधावे, अशी मागणीही या समाजाने केलेली नाही. मग हे 40 लाख रुपये कशासाठी खर्च केले जात आहेत, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. या मागे मोठे षढयंत्र असून, लोकप्रतिनिधी जर प्रशासनाला हाताशी धरुन अशी खोटी बिले करत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. हा जनतेचा पैसा आहे. याचा विनियोग योग्य प्रकारेच झाला पाहिजे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी ही खोटी बिले तयार करुन दिलीत त्यांच्यावरही कारवाई केली जावी. याबाबत आपण न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सुचित केले.

गाव तेथे तळे हा नियम बदला
अलिबाग- मुरुड तालुक्यात गाव तेथे तळे ही योजना राबविली जात आहे.पण ती राबविताना किती एकरासाठी हे तळे दिले जाणार याचा खुलासा होणे गरजेचे आहे.अशी मागणीही त्यांनी केली.

स्थानिकांना रोजगार मिळावा
चावणे येथे एचपीसीएल कंपनीचे प्रकल्प आहेत. मात्र तेथे स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याची खंत आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केली.वास्तविक ज्या गावात,परिसरात असे प्रकल्प उभे केले जातात तेथील 80 टक्के स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे असा नियम आहे.पण त्याकडे एचपीसीएल कंपनीवाले दुर्लक्ष करीत असल्याचेही जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

गॅस पाईपलाईन धोक्याची
पेण तालुक्यातील वाशी, हमरापूर पट्ट्यात टाकण्यात आलेली गॅसची पाईपलाईन स्थानिकांना धोक्याची ठरत असल्याचेही जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. या पाईपलाईनमुळे स्थानिकांना पाईपलाईनच्या 10 मीटर परिसरात कुठल्याही प्रकारे बांधकाम करता येत नाही. अशी तक्रार स्थानिक शेतकरी अनंत पाटील यांनी प्रशासनाकडे केलेली आहे.मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.

जमिनी परत करा
मुरुड तालुक्यातील साळाव येथील प्रकल्प उभारणीसाठी साळाव, निडी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी 10 वर्षापूर्वी संपादित करण्यात आलेल्या आहेत.मात्र आजतागायत या प्रकल्पाची उभारणी झालेली नाही. त्यामुळे या जमिनी संबंधित शेतकऱ्यांना वापरता येत नाहीत. यासाठी सरकारने त्यांच्या जमिनी तातडीने परत कराव्यात अशी मागणी जयंत पाटील यांनी यावेळी केली.

Exit mobile version