| छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्यात चार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून दहा महिन्यापासून पसार असलेल्या आरोपीला महामार्ग पोलिसांनी अखेर ताब्यात घेत रायगड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. बुधवारी (दि.11) रोजी दुपारी समृध्दी महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. महेश प्रल्हाद भोगावे (35) रा. कात्रज, पुणे असे आरोपीचे नाव असून बनावट कागदपत्राआधारे जमिन विक्री केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
दिघी सागरी पोलीस ठाण्यात 27 मार्चला पुणे येथील बिल्डर राजकुमार अग्रवाल यांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांची श्रीवर्धन तालुक्यातील जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करुन महेश भोगावे यानी ती परस्पर विक्री केली होती. यामध्ये साडेतीन ते चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून भोगावे पसार होता. बुधवारी (दि.11) दिघी सागरी येथील एपीआय हनुमंत शिंदे यांनी महामार्ग पोलिसांशी संपर्क साधला होता. यामध्ये पसार आरोपी महेश भोगावे हा समृध्दी महामार्गाने लाड, कारंजा मेहकरुवरुन निघाला असून पुणे येथे जात असल्याची माहिती दिली होती. या माहितीवरुन महामार्ग पोलिसांनी सावंगी इंटरचेंजवर सापळा रचला होता. कारमध्ये येत असलेल्या आरोपी भोगावे याला संशय येऊ नये म्हणुन वाहन तपासणी सुरु असल्याचा दिखावा करण्यात आला. भोगावे असलेली कार जालन्याकडून आल्यानंतर ती तपासणीच्या बहाण्याने अडवण्यात आली. भोगावे याला खाली उतरवून त्याची चौकशी करीत खात्री पटल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आणि रायगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक रुपाली दरेकर, सचिन कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपिनीक्षक काकासाहेब नागवे, बलभीम गोरे, प्रकाश मोहीते, किशोर घुगे, सुनिल काकड आदींनी केली.






