निवडणूक प्रशिक्षणास दांडी

52 निरीक्षकांना नोटिसा

| नाशिक | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीत संवेदनशील मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक म्हणून नियुक्त कर्मचाऱ्यांना जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास दांडी मारलेल्या जिल्ह्यातील 52 कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघांसाठी 20 मेस मतदान होणार आहे.

त्यादृष्टीने जिल्ह्यातील चार हजार 800 मतदान केंद्रांवर 30 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यात एलआयसी व शासकीय बँकेच्या 620 कर्मचाऱ्यांवर संवेदनशील मतदान केंद्राचे सूक्ष्म निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक विभागाने त्यांच्यासाठी मंगळवारी (दि.23) महाकवी कालिदास कलामंदिरात सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत प्रशिक्षण आयोजित केले होते.

निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, दिंडोरीचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील 22 संवेदनशील केंद्रांची घोषणा करण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात 19, तर दिंडोरीत अवघे तीनच मतदारसंघ संवेदनशील आहेत.

मतदान केंद्राबाहेर सूक्ष्म निरीक्षक म्हणून त्यांची जबाबदारी महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने स्वतंत्ररीत्या प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील 52 कर्मचाऱ्यांनी दांडी मारली असून, त्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्याकडून उत्तर प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

Exit mobile version