नवी मुंबईकरांसाठी मुबलक पाणी

। पनवेल । वार्ताहर ।

नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या असणार्‍या मोरबे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून 1 सप्टेंबरपर्यंत धरण 85 टक्के भरले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.

मोरबे धरण जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत निम्मे रिकामेच होते. त्यामुळे यंदा पाणीकपात करावी लागते की काय, अशी चिंता पालिका प्रशासनाला होती; मात्र जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

12 जुलैला मोरबेत अवघा 42 टक्के पाणीसाठा होता. सद्यस्थितीत 85 टक्के पाणीसाठा असून संततधार सुरू असलेल्या महिनाअखेर धरण भरण्याची शक्यता आहे. सध्या मोरबे धरणातून शहराला प्रतिदिन 420 एमएलडी पाणी पुरविले जात आहे. तसेच कामोठे व मोरबे परिसरातील सात गावांनाही पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या धरणात 24 जून 2023 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत भरण्याचा अंदाज
मोरबे धरणाची पातळी 88 मीटरला पूर्ण भरते. 2018 मध्ये 25 जुलै रोजी, तर 2019 मध्ये 4 ऑगस्टमध्येच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. 2020 मध्ये मात्र पाऊस लांबल्याने 95 टक्के धरण भरले होते. 2021 मध्येदेखील धरण काठोकाठ भरले होते; पण यंदा मोरबे धरणात 85.07 मीटर पाणीसाठा जमा झाला आहे. शिवाय धरण क्षेत्रात जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर सप्टेंबर अखेरपर्यंत धरण पूर्णपणे भरणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Exit mobile version