पाच जणांवर गुन्हा दाखल
। ठाणे । प्रतिनिधी ।
कल्याणमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका खासगी, अनधिकृत वसतिगृहावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करून 29 बालकांची सुटका केली आहे. या वसतिगृहात मुलींवर लैंगिक अत्याचार केले जात होते, तर मुलांना अमानुषपणे मारहाण होत होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने वसतिगृहाची पाहणी केली. याप्रकरणी संस्थेच्या संचालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाईल्ड हेल्प लाईनवर खडवली येथील पसायदान विकास संस्थेबाबत तक्रार आली होती. तक्रारीमध्ये संस्थेत बालकांना शारीरिक मारहाण केली जात असून लैंगिक अत्याचार होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी पोलिसांना सोबत घेऊन संस्थेची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आणि बालकांशी संवाद साधल्यानंतर असे आढळून आले की, प्रकाश गुप्ता नावाच्या वसतिगृह कर्मचाऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. तसेच, या वसतिगृहात मुलांना मारहाणही होत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संस्थेत असलेल्या 29 बालकांची सुटका केली. यामध्ये 20 मुली आणि नऊ मुलांचा समावेश आहे. सुटका केलेल्या सर्व बालकांना बालकल्याण समितीसमोर आणले. तसेच, या प्रकरणी संचालक बबन शिंदे, त्याची पत्नी आशा शिंदे, मुलगा प्रसन्न शिंदे, शिक्षिका दर्शना पंडित आणि कर्मचारी प्रकाश गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे.