। मुंबई । प्रतिनिधी ।
एका १९ वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवत तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल करून तो अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. तिच्या तक्रारीनुसार, या तरुणीला प्रफुल लोढा याने नोकरीचे आमिष दाखवत तिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलवले. पीडित तरुणी त्याठिकाणी पोहोचल्यानंतर त्याने तिथे तिच्यावर जबरदस्ती संबंध प्रस्थापित केले.पीडितेने कुटुंबीयांना याबाबत सांगितल्यावर त्यांनी तिला रुग्णालयात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले.
त्यानंतर मुलीने साकीनाका पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवत ७ जुलै रोजी लोढा विरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना अंधेरी पूर्वच्या एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी प्रफुल लोढाला १७ तारखेला अटक करून स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.







