सिडकोचे लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अर्जाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी सिडकोमधील उपनिबंधक कार्यालयातील लोकसेवकांनी लाचेची मागणी केली. बुधवारी (दि.10) सायंकाळी साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यामध्ये ऑफिस असिस्टंट, सहकार अधिकारी, खासगी इसम व शिपाई या चौघांचा समावेश असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार वाशी येथील रहिवासी आहेत. तक्रारदार हे सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत असताना चेअरमन नोमान चौधरी व इतर दोन सदस्य यांनी राजीनामा देऊन सोसायटीची कमिटी रद्द होण्याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था, सिडको, नवी मुंबई येथे अर्ज सादर केला. सन 2023-24 मध्ये सोसायटीची वार्षिक सर्वसाधरण सभा उशीरा घेतल्याने सोसायटीच्या कमिटीवर कारवाई होण्यासाठी सोसायटीचे सभासद युसुफ चौधरी यांनी उपनिबंधक सहकारी संस्था, सिडको, यांच्याकडे अर्ज सादर केला. अर्जाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी उपनिबंधक कार्यालयातील लोकसेवक यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली. याबाबत नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार केली. तडजोड अंती साडेतीन लाख रुपये देण्याचे ठरले. पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार वाघ, पोलीस हवालदार नितीन पवार, भरत गिरासे, चालक पोलीस हवालदार रतन गायकवाड, योगेश नाईक, विशाल अहिरे, महिला पोलीस नाईक पल्लवी कदम, दिपाली सावंत, महिला पोलीस शिपाई योगिता चाळके या पथकाने बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. नवी मुंबईमधील सिडकोतील सहकारी संस्था सहनिबंधक कार्यालयामधील ऑफिस असिसस्टंट राहूल कांबळे, सहकार अधिकारी धनाजी काळुखे, खासगी इसम किशोर मोरे व शिपाई महेश कामोठकर या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन
रायगड, ठाणे, नवी मुंबई जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी केले आहे. तसेच तक्रारीसाठी 1064 या टोल फ्रि क्रंमांकावर संपर्क साधू शकता, असेही सांगण्यात आले आहे.
Exit mobile version