टॅबमुळे पासपोर्ट पडताळणी जलद

| अलिबाग | प्रतिनिधी |

पासपोर्ट पडताळणीच्या कामांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये टॅब देण्यात आले आहेत. या टॅबमुळे पडताळणीसाठी लागणारा वेळ वाचू लागला आहे.

पासपोर्टसाठी अर्ज करण्यापासून, पोलीस पडताळणी व पासपोर्ट मिळेपर्यंतची प्रक्रिया तीन महिने चालत असते. त्यामुळे पोलिसांबरोबरच पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांचाही वेळ खर्च होतो. पोलीस कर्मचाऱ्यांसह पासपोर्ट धारकांची होणारी ही वणवण आता टॅबमुळे थांबणार आहे. रायगड जिल्हयातील 28 पोलीस ठाण्यांसह जिल्हा विशेष शाखेला टॅब वाटप केले आहेत. या टॅबमध्ये एम. पासपोर्ट ॲप डाऊनलोड केल्यानंतर पडताळणी पोलीस ठाण्याद्वारे केली जाते. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत किंवा नाहीत याची माहिती सीसीटीएनएसद्वारे घेतली जाते. त्यानंतर तो लेखाजोखा पोलीस अधिक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेकडे पाठविला जातो. जिल्हा विशेष शाखेच्या अंतिम तपासणीनंतर थेट पासपोर्ट कार्यालयाकडे पासपोर्ट धारकाची माहिती पाठविली जातेे. तेथून पंधरा दिवसात पासपोर्ट नागरिकांच्या घरी पोहचत आहे. या प्रक्रियेमुळे पासपोर्ट धारकांसह पोलीस विभागाचे कामकाजही अधिक गतीशील झाले आहे.

आता एका दिवसात होते पडताळणी
पूर्वी पासपोर्ट पडताळणीसाठी पोलिसांना नागरिकांच्या घरी जावे लागत होते. अनेकवेळा ती व्यक्ती घरात नसल्याने पोलिसांना परत यावे लागत होते. ही प्रक्रिया त्रासदायक असल्याने वेळही खूप जात होता. मात्र टॅबमुळे पोलीस ठाण्यातच पासपोर्टधारकाची पडताळणी केली जात आहे. पंधरा ते वीस मिनीटात दहा नागरिकांची पडताळणी होत असल्याने हे काम अधिक जलद झाले आहे.
Exit mobile version