रायगडात भात कापणीला वेग

मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी चिंतातूर
। चिरनेर । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात तालुक्यात भात कापणी सुरू झाली असून सर्वत्र शेतमजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी भातकापणीसाठी भातकापणी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे. मात्र उरण तालुक्यात हे भात कापणी यंत्र पोहोचले नसल्यामुळे येथील शेतकर्‍यांना भातपिक कापण्यासाठी मजुरांशिवाय पर्याय उरला नसल्याने मजुरां अभावी भातपिकांची कापणी वेळेवर होत नसल्यामुळे येथील शेतकरी चिंतातुर झाला आहे.
निसर्ग चक्राचे बिघडलेले संतुलन आणि अवकाळी पडणारा पाऊस ही भीती शेतकर्‍यांच्या मनात असते. अशातच हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाऊ नये म्हणून शेतकर्‍यांची भात कापणीची धावपळ सुरू झाली आहे. परंतु भातकापणी करीता वेळीच मजूर मिळत नसल्याने येथील शेतकरी हवालदिल आहेत.
उरण तालुक्यात विभागात अनेक ठिकाणी आदिवासी मजुरांचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. एकेकाळी भातकापणी झाल्यानंतर भातपिकांची कडवे चार दिवस चांगली वाळल्यानंतर त्याचे भारे बांधून ते उडव्यात रचून ठेवले जात असत. परंतू सध्याच्या लहरी पावसाच्या भितीने वर्षभर केलेले कष्ट व त्यासाठी केलेला अमाप खर्च वाया जावू नये म्हणून शेतकरी पिके वाळवताच व त्याची साठवणूक न करतात ताबडतोब कापलेले भातपिक झोडून भात घरी आणत आहेत. येथील शेतकर्‍यांना शेती परवडत नसल्याने भात पीक कापणी यंत्र घ्यायला कोणीच तयार होत नाही. त्यामुळे ज्या मुठभर शेतकर्‍यांनी भातशेती लागवडीखाली आणली आहे, त्यांना वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.

Exit mobile version