। भांडूप । प्रतिनिधी ।
कोकण प्रादेशिक विभागाच्या वीजबिल वसुलीत मार्चनंतर पुन्हा शिथिलता आली आहे. परिणामी एप्रिल महिन्याचेचालू वीजबिलही पूर्णपणे वसूल होऊ शकलेले नाही. त्यामुळे महिन्याच्या एक तारखेपासूनच चालू वीजबिल आणि थकबाकी वसुलीच्या कामाला गती देऊन महिन्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.कोकण प्रादेशिक विभागातील भांडुप, कल्याण, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता व त्याअंतर्गतपेण, ठाणे, वाशी, कल्याण एक व दोन, वसई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, मालेगाव,अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या मंडलकार्यालयांचे अधीक्षक अभियंता यांच्या समवेत भांडूप परिमंडल कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी (06 मे) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
कोकण प्रादेशिक विभागात न्यायप्रविष्ट प्रलंबित प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने सुरु करण्याच्या सूचना डांगे यांनी दिल्या. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना नवसंजीवनी ठरू शकणार्या विलासराव देशमुख अभय योजनेतून सवलत द्यावी व सन्मानाने वीजवापर करण्याबाबत त्यांना प्रोत्साहित करावे. मीटर रीडिंग एजन्सीकडून आलेल्या रीडिंगच्या फोटोंची शंभर टक्के पडताळणी करावी व यात अनियमितता आढळल्यास कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पावसाळापूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. कर्मचार्यांशी संबंधित शिस्तभंग, चौकशी, निवृत्तीवेतन दावे, अनुकंपा तत्वावर वारसांना नोकरीत सामावून घेण्याची प्रकरणे मुदतीत सोडवावीत असे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला सुरेश गणेशकर, धनंजय औंढेकर, दीपक कुमठेकर,कैलास हुमणे, विजय भटकर यांच्यासह सर्व मंडल कार्यालयांचे अधीक्षक अभियंते उपस्थित होते.







