जिल्ह्यात आदिवासी स्थलांतरणाचा वेग वाढला

वाड्यावस्त्या आणि शाळा पडल्या ओस; खेडो-पाड्यातील बाजारपेठा मंदावल्या
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
मागील वर्षी कोरोना आणि लॉकडाऊन मुळे आदिवासी स्थलांतर फारसे झाले नव्हते. मात्र यंदा तुळशीची लग्ने आटोपली आणि मग जिल्ह्यातील रानाची पाखरं असलेल्या आदिवासी बांधवांची पोटापाण्यासाठी इतर राज्यात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले आहे. त्यामूळे जिल्ह्यातील आदिवासी वाडे-पाड्या आणि वस्त्या ओस पडु लागल्या आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुले देखील आपोआप कमी होऊन शाळा देखील ओस पडल्या आहेत. याचा परिणाम खेडो-पाड्यातील बाजारपेठाही मंदावल्याच्या दिसून येत आहे. जिल्ह्यातील आदिवासींचे कामासाठी परराज्यात व इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. मात्र अगदी अत्यल्प मोबदल्यात कामाच्या ठिकाणी त्यांचे शोषण होते. शिवाय तेथे त्यांना वेठबिगार्‍या प्रमाणे वागवले जाते. यातून त्यांचे व मुलाबाळांचे आर्थिक, मानसिक व शैक्षणिक नुकसान होत आहे. स्थलांतर रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांनी सप्तसूत्री जारी केली आहे. मात्र तरी देखील पोटापाण्यासाठी आदिवासींचे स्थलांतर थांबतांना दिसत नाही. ठाकुर समाजातील लोकांपेक्षा कातकरी समाजातील लोकांचे स्थलांतर अधिक होतांना दिसते. येथील आदिवासींना परराज्यात व जिल्ह्यात वृक्षतोड, विटभट्टी, ऊस तोडणी व कोळसा पाडण्याच्या कामाला नेले जाते. येथील बहुतेक आदिवासी कुटूंब आपली भांडी-कुंडी, सामन विकुन ठेकेदारासोबत सोबत कर्नाटक, बेळगाव, उत्तरप्रदेश, हैद्राबाद, विदर्भ, पच्छिम महाराष्ट्र, सातारा, कराड, सांगली, रत्नागिरी, अशा ठिकाणी जातात. सामान विकले नाही तर ते चोरी होण्याची भिती असते. काही जण शिमगा, पाडवा झाल्यावर तर काही जण पावसाळा सुरु होण्याच्या आधी आपल्या घरी परतात.बायका-पोरांसोबत स्थलांतरित झाल्याने मुलांचे शिक्षण अपूर्णच राहते. शाळा अक्षरशः ओस पडतात. या आदिवासींवर अवलंबुन असलेले व्यापारी व दुकानदार यांचा धंदा देखिल मंदावतो. घरी ठेवलेल्या वृद्धांची खूप परवड होते. या सर्व स्थलांतराच्या चक्रव्यूहात कळत नकळत आदिवासी समाज अडकून पडलेला आहे.

Exit mobile version