शेती मशागतीच्या कामाला वेग

। तळा । वार्ताहर ।

तळा तालुक्यात बळीराजाने आपल्या शेतात मान्सूनपूर्व शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. यंदा मान्सून लवकर येण्याची चिन्हे दिसू लागली असल्याने त्यात लग्नसराईचा वेगही मंदावला असल्याने रणरणत्या उन्हात मशागतीचा वेग घेतला असल्याचे चित्र दिसून येत आहे. नदी, धरणाच्या पाण्यावर असणारी उन्हाळी शेती तयार होत असून कोरडवाहू शेतीत बळीराजा कामात गुंतला आहे. मान्सून पूर्णपणे महाराष्ट्रात येण्यास अजून पंधरा दिवसांचा अवधी बाकी असल्याने भाजवळ, कुंपणकाठी, बांध-बंदीस्ती पालापाचोळा जाळणे, झाडेझुडपे तोडणी, झाडलोट, शेतातील माती काढणे, गुरांंचा वाडा साकारणी, कौलघराची साफसफाई वगैरेच्या कामाला वेेेग आला आहे. अनेक योजनांचा जाचक अटीमुळे लाभ मिळत नसला तरी भविष्याची चिंता करावी लागत असल्याने पारंपरिक शेती व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी तालुक्यातील शेतकरी वर्ग प्रयत्नशिल असतो. वाढलेली महागाई, बी बियाणांचे वाढलेले दर, वाढलेली मजुरी यांचा विचार न करता आपला पारंपरिक शेती व्यवसाय जोपासण्यासाठी शेतीच्या कामात व्यस्त झालेला बळीराजा गावोगावी पहायला मिळत आहे.

Exit mobile version