ग्रामदेवतांच्या यात्रांमुळे अर्थचक्राला गती

रायगडात सर्वत्र उत्साहाचे वातावरण
| माणगांव | प्रतिनिधी |
उत्सवप्रियता ही कोकणाची ओळख. ग्रामीण भागात ग्रामदैवतांच्या उत्सवांना धार्मिक महत्व असून ग्रामस्थ व चाकरमानी या उत्सवात आनंदाने सहभागी होतात.वर्षभर विविध सण उत्सव साजरे करणार्‍या गावात चैत्र महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्व आहे. या दिवशी अनेक कार्यक्रम जत्रा, पालखी सोहळे गावागावात आयोजित केले जातात. रायगडातही अनेक गावातील वार्षिक जत्रोत्सवास मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला आहे. यामुळे ग्रामीण अर्थकारणाला गती मिळत असल्याचे जाणवत आहे.

चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून गावागावात ग्रामदैवतांच्या जत्रा ,पालखी सोहळे व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. चैत्र पौर्णिमेपासून अनेक गावागावात जत्रांचा व ग्रामदैवतांच्या उत्सवांचा कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामदैवत पालखी, मनोरंजन कार्यक्रम गावाचा सार्वजनिक उत्सव साजरा केला जातो. यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात घरगुती साहित्यांची खरेदी, विक्री केली जाते अनेक मनोरंजनात्मक बाबी यांमध्ये असतात व लहान थोर अत्यंत आनंदाने सहभागी होतात.

लेझीम ढोल ताशांच्या गजरात घुंगुर लावलेल्या विविध कापडी पताकांच्या काठ्या सजवून मिरवणूक काढली जाते. गावागावातून लाठ (बगाड)फिरविली जाते. जत्रोत्सव तयारीला वेग आला असून मंदिरांचे रंगरंगोटी, सुशोभीकरण ग्राम स्वछता केली जात आहे. जत्रांमध्ये विविध प्रकारची दुकाने असतात यामधून मोठया प्रमाणावर खरेदी विक्री केली जाते. पावसाळ्याची बेगमी जत्रोत्सवात केली जाते. खेळणी, मिठाई, घरगुती साहित्याची खरेदी जत्रातून केली जाते. या दिवशी ग्राम देवतेची पालखी संपूर्ण गावात फिरवली जाते.

घुंगुरकाठ्यांची परंपरा
या पालखीत घुंगुर काठ्या नाचविण्याची मोठी परंपरा कोकणात आहे. या घूंगुर काठ्या उंच बांबूच्या असतात.त्यांना विविध कापडी फरव्याने साजविले जाते. त्यांना घुंगुर बांधले जातात. या काठ्या मिरवणुकीत नाचविल्या जातात. आसमंतात फिरणार्‍या या काठ्या मिरवणुकीत पाहणे आनंदाचे असते. काही गावातून सांस्कृतिक, मनोरंजानात्मक कार्यक्रम ठेवले जातात.अत्यंत भाव भक्तिमय व आनंददायी असा जत्रोत्सव असतो. गत दोन वर्षी कोरोणाचे संकट असताना गावच्या जत्रांचे कार्यक्रम बंधनात साजरे केले गेले. यावर्षी मात्र पूर्ण बंधमुक्त अत्यंत उत्साहात गावोगावी जत्रोत्सव साजरा करण्यात येणार असून उत्सवपूर्व तयारीला वेग आला आहे.

Exit mobile version