| रसायनी । वार्ताहर ।
रसायनी ते कोन फाटा रस्त्याची पावसाळ्यामुळे दुरवस्था झाली होती. खड्डे चुकवण्याच्या नादात चालकांना अक्षरशः कसरत करावी लागायची. त्यामुळे रस्त्याचे काम करावे, अशी मागणी स्थानिकांसह कारखानदार असोसिएशनने केली होती. त्यानुसार नारपोली ते कोनफाटा दरम्यानच्या साधारण साडेपाच किलो मीटर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच या मार्गावरील प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा चालकांना आहे.
राज्य मार्गावरील कोन, कसळखंड, सोमाटणे आदी ग्रामपंचायतीतून जाणार्या मार्गावरील गावे, गोदामे तसेच पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना जोडणारा हा रस्ता आहे. याशिवाय रसायनीतील कारखाने, देवळोली, सावळे, पोसरी, वावेघर, तुराडे, गुळसुंदे, आपटे, जांभिवली, कराडे-खुर्द, वडगाव, इसांबे, वासांबे-मोहोपाडा, चांभार्ली आदी ग्रामपंचायतींतील महत्त्वाचा आणि पनवेल, नवी मुंबईला थेट जाणारा हा रस्ता असल्यामुळे कायम वर्दळीचा आहे.
खड्डेमय मार्गामुळे चालकांसह प्रवासीही त्रस्त होते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत पहिल्या टप्प्यात कोनफाटा ते कसळखंड थांबादरम्यान 790 मीटरच्या चार भागांत काँक्रीटीकरण सुरू केले, तर दुसर्या टप्प्यात नवकार गोदाम ते नारपोलीपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. कसळखंड फाट्यावर सुमारे दोनशे मीटरचे काम अद्याप बाकी आहे. हे काम पूर्ण झाल्यावर सुमारे साडेपाच किमी रस्त्याचेे काम पूर्ण होईल व रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल.