। कुडाळ । वृत्तसंस्था ।
स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना आव्हाने स्वीकारली पाहिजेत. जिद्द, चिकाटी, मेहनत या त्रिसूत्रीला आत्मविश्वासाची जोड द्या, असे प्रतिपादन कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी मांडकुली येथे केले. मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल संस्थेच्यावतीने आयोजित शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी मांडकुली-केरवडे संचलित प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमित विद्यालयात मनोरमा महादेव चौधरी चॅरीटेबल ट्रस्ट वालावल संस्थेकडून प्रशालेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, कुडाळ ट्रस्टचे सचिव संदीप साळसकर, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, संस्था सचिव अंकुश जाधव, खजिनदार अर्जुन परब, उपखजिनदार करिष्मा भोई, संचालक सतीश पडते, वामन गावडे, शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष बाबाजी पेडणेकर, देवदत्त चुबे, मुख्याध्यापक सुरेंद्र खोत, गिरीश सरवटे, अनिल गोवेकर, प्रज्ञा रांगणेकर, राहुल कानडे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक खोत यांनी परिचय केला.
चौधरी ट्रस्टच्यावतीने विद्यार्थ्यांना विविध साहित्य वितरण केले. सूर्यकांत बागवे यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली. तहसीलदार वसावे यांनी स्पर्धा परीक्षा व करिअर संधी याबाबत मार्गदर्शन करून पुन्हा प्रशालेस भेट देऊन पालक व विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेऊ, असे सांगितले. दयानंद चौधरी यांनी ग्रामीण भागात शाळा असूनही चांगले काम चालू असून, ट्रस्टकडून प्रशालेला स्मार्ट टीव्ही देण्याचे व विविध गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वासित केले. रुपेश कानडे यांनी प्रशालेच्या शैक्षणिक प्रगतीबाबत कौतुक करून प्रशालेला सहकार्याचे आश्वासन दिले.