आरोग्य विभागाला ‘रिक्त’चे ग्रहण

आंबेवाडी केंद्रांतर्गत आरोग्यसेविकांची पदे रिक्त अपुरा औषधसाठा; रुग्णांमध्ये नाराजी

| कोलाड | वार्ताहर |
प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी अंतर्गत असलेल्या उपकेंद्रांमध्ये आरोग्यसेविकांसह अन्य कर्मचार्‍यांच्या जागा अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. दरम्यान, जागा भरण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे वेळोवेळी मागणी करूनही त्याला केराची टोपली दाखविली जात असल्याने कर्मचार्‍यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने पत्रकार कांतीलाल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

आंबेवाडी प्राथमिक केंद्रांतर्गत येत असलेल्या कुडली, सुतारवाडी, तळवली, गारभट, संभे, धाटाव यांपैकी धाटाव, संभे, गारभट या उपकेंद्रांमध्ये अनेक महिन्यांपासून आरोग्यसेविका हे पद रिक्त आहे. त्याचप्रमाणे उपकेंद्र तळवली आणि संभे येथे आरोग्य सेवकांची पद रिक्त आहेत. एवढेच नाही तर, प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी येथील हिवताप कार्यालयात आरोग्य सहाय्यक हे पद रिक्त आहे. शासन तळागाळातील नागरिकांची काळजी घेत असताना, ही रिक्त पदं भरली जात नसल्याने कार्यरत कर्मचार्‍यांवर कामाचा ताण येत आहे. याकडे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देणे जरुरीचे आहे. परंतु, जिल्हा आरोग्यच जर दखल घेत नसेल, तर मागणी कोणाकडे करायची, असा मोठा प्रश्‍न कर्मचार्‍यांना पडला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडीच्या अंतर्गत एकावन्न गावं येत असून, तेथील लोकसंख्या 61,481 एवढी आहे. काही गावं दुर्गम भागात आहेत. एखादी साथ पसरली की, कर्मचार्‍यांना कसरत करावी लागत असते. या आरोग्य केंद्रात औषधांचा साठा ही पुरेसा नाही, तसेच वयोगट 10, 15, 16 साठी वॅक्सिनचा तुटवडा आहे. तो लवकर उपलब्ध व्हावा, अशी परिसरातील नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

Exit mobile version