25 हजाराची लाच स्विकारणार्‍या
भुकरमापकाला रंगेहाथ पकडले

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कळंब येथील जमीनीची मोजणी करण्यासाठी एक लाख पन्नास हजार रुपयांची मागणी करुन त्यापैकी 25 हजार रुपयांची लाच स्विकारणार्‍या भुमिअभिलेखच्या भुकरमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

बालाजी रावसाहेब राऊत वय 32 वर्षे असे या लाचखोर भुकरमापकाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या कर्जत तालुक्यातील कळंब येथील जमिनीची मोजणी करायची होती. त्यामुळे त्यांनी कर्जत भुमिअभिलेख कार्यालयात रितसर अर्ज केला होता. तेथे असलेल्या भुकरमापक बालाजी रावसाहेब राऊत याने सदर जमिनीच्या मोजणीसाठी 1 लाख 50 हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. त्यामुळे तक्रारदार यांनी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 11 जुलै रोजी तक्रार केली. सदर तक्रारीची चौकशी करुन खात्री पटल्याने बुधवार दिनांक 13 जुलै रोजी बालाजी राऊत याच्याविरुद्ध सापळा रचण्यात आला. त्यानुसार कर्जत भुमिअभिलेख कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून मागणी केलेल्या रकमपैकी 25 हजार रुपयांची रक्कम पंच आणि साक्षीदारांसमक्ष भुकरमापक बालाजी राऊत याने स्विकारली. सदर रक्कम स्विकारताच दबा धरुन बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, पोलिस हवालदार कौस्तुभ मगर, पोलिस नाईक विवेक खंडागळे, महिला पोलिस नाईक स्वप्नाली पाटील यांच्या पथकाने रंगेहाथ पकडून लाचेची रक्कम त्याच्याकडून हस्तगत केली.

Exit mobile version