| रेवदंडा | वार्ताहर |
पुणे येथील एक विवाहित जोडपे रविवारी (दि.17) रेवदंडा येथील ऐतिहासिक आगरकोट किल्ला व प्रसिद्ध सातखणी बुरुज पाहण्यासाठी गेले होते. किल्ल्याची सफर करत असताना ते सातखणी बुरुजाजवळ पोहोचले आणि दुर्दैवी घटना घडली.
पुणे येथील एक विवाहित जोडपे रेवदंडा येथील ऐतिहासिक आगरकोट किल्ला व प्रसिद्ध सातखणी बुरुज पाहण्यासाठी गेले होते. अबोली श्रीकांत देशपांडे (53) या फिरून झाल्यावर बुरुजाजवळ ठेवलेली बॅग आणण्यासाठी गेल्या असता त्यांच्या डोक्यावर बुरुजाचा सिमेंटचा काही भाग कोसळला. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढे अलिबाग येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेमुळे ऐतिहासिक वारशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगरकोट किल्ला व सातखणी बुरुज अत्यंत जीर्णावस्थेत असून, पर्यटकांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून बुरुजांची दुरुस्ती सुरू करणे आवश्यक आहे. धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावणे सक्तीचे असावे. पर्यटकांसाठी सुरक्षितता उपाययोजना करणे विलंब न लावता सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.
नागरिकांसह पर्यटकांमध्ये संताप
या अपघातानंतर स्थानिक नागरिक व पर्यटकांमध्ये संताप व्यक्त होत असून, पुरातत्व विभाग, महसूल खाते व राज्य शासन जाणूनबुजून या किल्ल्याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा रंगली आहे. काहींच्या मते, आगरकोट किल्ल्याचे जतन न करता, त्याला नकाशावरून गायब करण्याचा डाव सरकारी अधिकाऱ्यांचा आहे. पैशाच्या हव्यासापोटी हा किल्ला बिल्डर लॉबीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप होत आहेत.







