| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-पेण मार्गावरील गोंधळपाडा स्थानकाजवळ एसटी व कारचा समोरासमोर शनिवारी सकाळी अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने मोठा अपघात टळला. एसटी सावकाश असल्याने होणारा अपघात टळला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. कारचालकाचा ताबा सुटल्याने चुकीच्या बाजूला जाऊन हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मुरुड आगारातून सकाळी सव्वा वाजता (एमएच-14-बी-टी-4162) या क्रमांकाची एसटी घेऊन चालक गजानन मोरे कल्याणकडे प्रवाशांसमवेत निघाले. गोंधळपाडा येथे आल्यावर दहा वाजण्याच्या सुमारास (एमएच-06-ए.झेड-9227) या क्रमांकाची कार समोरून आली. दरम्यान कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. रस्त्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या बसला जोरदार धडक कारची लागली. या धडकेत एसटीसह कारचे समोरील भागाचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने एसटीतील प्रवाशांसह कारमधील चालक बचावले. यामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाल्याचे समोर येत आहे. कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने चुकीच्या बाजुने जाऊन अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस रुपेश शिर्केसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.या अपघातप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.
चालकाच्या सतर्कतेमुळे जीव वाचला
एसटीतील प्रवाशांना दुसऱ्या एसटीत बसवून त्यांच्या निश्चित स्थळी रवाना करण्याचे काम अलिबाग एसटी बस आगारामार्फत करण्यात आले असल्याचे आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांनी सांगितले.