इंदापूर येथे तीन वाहनांमध्ये अपघात एक जखमी, वाहनांचे नुकसान

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावपासून 9 किमी अंतरावर असणार्‍या इंदापूर गावात बसस्थानकाच्या पुढे मुंबई-गोवा महामार्गावर बायपास रस्त्याजवळ एर्टिगा कार, टँकर व इनोव्हा कार या तीन वाहनांमध्ये अपघात होऊन एकजण जखमी झाला असून तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. सदरील अपघात बुधवारी (दि.18) घडला. या अपघाताची फिर्याद एर्टिगा कार चालक बाबुलाल नारायण पवार रा.शिगाव बोईसर जि.पालघर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.


सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, या अपघाताच्या गुन्ह्यातील फिर्यादी बाबुलाल नारायण पवार हे त्यांच्या ताब्यातील एर्टिगा कार क्र.एम.एच.48 सीसी 7319 हि गाडी घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने बोईसर येथे जात असताना इंदापूर बसस्थानकाच्या पुढे आल्यावर समोरून येणारा टँकर क्र.एम.एच.46, ए.एफ.3106 या गाडीवरील अज्ञात चालकाने टँकर रस्त्याच्या विरुद्ध दिशेला घेऊन एर्टिगा कारला समोरून ठोकर मारल्याने फिर्यादी यांची गाडी रस्त्यावर गोल फिरून मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे जाणार्‍या इनोव्हा कार क्र.एम.एच.43, ए.बी.3488 या गादीवर आदळून अपघात घडला. या अपघातात फिर्यादी बाबुलाल पवार यांना लहान मोठ्या स्वरूपाच्या दुखापती होऊन ते जखमी झाले व तिन्ही वाहनांचे नुकसान झाले असून टँकरवरील अज्ञात चालक हा घटनास्थळावरून पळून गेला.
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.133/2022 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 279, 337, 338 मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184, 134 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील या करीत आहेत.

Exit mobile version