| महाड | प्रतिनिधी |
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील उंबर्डेवाडी येथील वळणावरुन महाडकडून भोरच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी कार अनियंत्रित होऊन 100 फूट खोल दरीत कोसळली सोमवारी (दि.27) पहाटे चारच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर, आठ जण जखमी झाले असून, सर्व पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातात शुभम शिर्के (22), पुणे यांचा मृत्यू झाला आहे. मंगेश गुजर (26), अशोक गायकवाड (29), सिद्धार्थ गणधने (26), सौरब महादे (22), गणेश लावंडे (27), अभिषेक रेळेकर (25), यशराज चंद्रलोकूल (22), आणि आकाश आडकर (25) अशी जखमींची नावे आहेत. भोर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिक व सह्याद्री बचाव टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढले असून मृतदेह व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, भोर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राहुल मखरे, सुनील चव्हाण, सागर झेंडे, वारवंडचे पोलिस पाटील सुधीर दिघे, स्थानिक ग्रामस्थ यांनी घटनास्थळी पोहचून मदत केली. पुढील तपास भोर पोलिस करीत आहेत.







