अलिबागच्या पत्रकारांना अपघात विम्याचे संरक्षण

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून अलिबागमधील 27 पत्रकारांना 10 लाखाच्या अपघाती विम्याचे संरक्षण देण्यात आले. दिवसरात्र समाजाच्या घडामोडी टिपण्यासाठी धावपळ करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाकडून अपेक्षित लाभ मिळत नाही. त्यात अपघात झाला, तर आर्थिक मदतीची प्रचंड टंचाई होते. लोकांना मदत मिळवून देणारा पत्रकार अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहतो. ही बाब लक्षात घेऊन अलिबाग प्रेस असोसिएशनकडून प्रत्येकी 10 लाखांचा अपघाती विमा काढून देण्यात आला.

पत्रकार विविध अडचणीत असतानाही जनजागृती व समाजाच्या जडणघडणीत त्याचा मोलाचा वाटा असतो. अशा सर्व पत्रकारांना अपघात विमा पॉलिसी मिळावी म्हणून हा उपक्रम असोसिएशनकडून हाती घेण्यात आला. अलिबाग पोस्ट ऑफिसच्या सहकार्याने हा अपघात विमा काढण्यात आला. बुधवारी (दि. 22) अलिबाग प्रेस असोसिएशनच्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अलिबाग पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर गजेंद्र भुसाने, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पाटील, विपणन अधिकारी समीर म्हात्रे व पत्रकार उपस्थीत होते. आयपीपीबी सहाय्यक किरण दानवले, पोस्टमन अनिल दाभेकर व अमोल भटकर यांनी पत्रकारांचा विमा काढण्यात सहकार्य केले.

Exit mobile version