। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-रेवदंडा मार्गावरील नवेदर बेली ते आक्षी पुलाच्या दरम्यान कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. त्यात दुचाकीचे खुपच नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी (दि.15) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील नारायण बागुल हे सध्या मुरूडमध्ये राहत आहेत. मुरूडमधील एका विद्यालयात ते शिक्षक म्हणून नोकरी करीत आहेत. शुक्रवारी (दि.13) ते नाशिकला गेले होते. रविवारी (दि.15) ते नाशिककडून मुरूडकडे येण्यास निघाले. नागावमार्गे रेवदंड्याकडून ते मुरूडला त्यांच्या कारने जात होते. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नवेदर बेली ते आक्षी पुलाजवळ आल्यावर समोरून एक दुचाकी आली. कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीचालक सागर पाटील हा गंभीर जखमी झाला. तो कुरुळ येथील रहिवासी आहे. त्याच्यावर अलिबागमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात इतका भीषण होता, की दुचाकीचा चेंदामेंदा झाला असून कारच्याही पुढील भागाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे.