। नागोठणे । प्रतिनिधी ।
चार रस्ते एकत्र आलेल्या नागोठण्यातील उरूस सर्कल या ठिकाणी नागोठण्यातून पेणकडे जाणाऱ्या भरधाव इको कारने ऑरा कारला दिलेल्या जोरदार धडकेमुळे ऑरा कारचे नुकसान झाले आहे. हा अपघात गुरुवारी (दि. 12) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, नागोठण्यात मोटारसायकल दुरुस्तीसाठी लागणारे सामान घेऊन आलेली इको कार मधील चालक व अन्य एकजण ते सामान दुकानदाराकडे खाली करून पेण बाजूकडे जात होते. त्याचवेळी पोलादपूरहून अलिबागकडे ऑरा कार मधून जाणारे चार जण उरूस सर्कल येथून जात असताना इको कारचालकाने भरधावपणे कार चालवून ऑरा कारला धडक दिली. त्यामुळे ऑरा कारच्या समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान उरूस सर्कल येथे नागोठण्यात येण्याजाण्यासाठी अलिबाग, पेण व महाड बाजूकडून चार रस्ते एकत्र येतात. तसेच येथील रिलायन्स कंपनीत येणाऱ्या जाणाऱ्या आणि रिलायन्सच्या नवीन प्रकल्पाची उभारणी साठी येणाऱ्या अवजड वाहनांमुळे अलिबाग बाजूकडे व महाड तसेच पेण बाजूकडे ये- जा करणाऱ्या अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. ही वाहने उरूस सर्कल येथे भरधाव येत असतात तसेच सर्कलच्या ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे याठिकाणी भविष्यात मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता असल्याने त्यापूर्वी उरूस सर्कल येथील चारही बाजूकडील रस्त्यांवर तातडीने गतिरोधक बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.







