मुंबई गोवा महामार्गावर अपघात; वृद्धाचा मृत्यू


। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
मुंबई गोवा महामार्गावर तळेरे येथील एस.टी. बस स्टॅण्डसमोरील उड्डान पुलावर कार व मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन एकजण ठार झाला आहे.
गुणाजी भिवाजी जाधव (70) रा. कोंड्ये तर्फे सौंदळ ता. राजापूर जि. रत्नागिरी असे मत्याफ मृत वृद्धाचे नाव आहे. मोटरसायकल भरधाव वेगात ओव्हरटेक करून सिग्नल न देता अचानक डाव्या बाजुस वळविल्याने मोटरसायकल कारवर धडकून हा अपघात झाला.
वडिल गुणाजी भिवाजी जाधव यांना सोरासिसचा आजार असल्याने येथील रूग्णालयात उपचारासाठी त्यांचा मुलगा गितेश गुणाजी जाधव(34) हा मोटरसायकल ने (एमएच 01 बीएच 9438) घेऊन आला होता.
तळेर येथील उड्डान पुल संपत असताना मोटरसायकलच्या मागून भरधाव वेगात आलेल्या सफेद रंगाच्या (एमएच 07 जी 8989) एस क्रास गाडीने ओव्हरटेक केली व सिग्नल न देता अचानक डाव्या बाजुस तळेरे बाजारपेठेच्या साईड रोडला वळविली. यामुळे मोटरसायकलची धडक कार ला बसली. या धडकेनंतर पिता-पुत्र महामार्गावर पडले.
वडिल गुणाजी भिवाजी जाधव (70) यांच्या डोकीस गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध पडले. तर मुलगा गितेश जाधव याचे किरकोळ दुखापतीवर निभावले. गंभीर जखमी झालेल्या गुणाजी जाधव यांना तातडीने रूग्णवाहिकेतून खाजगी रूग्णालयात आणले.
डॉक्टरांनी त्यांना रूग्णवाहिकेतच तपासून उपजिल्हा रूग्णालयात नेण्यास सांगितले. तेथील डॉक्टरांनी ते मयत झाले असल्याचे जाहीर केले.दिलीप तळेकर यांच्या मालकाची कार होती. ही कार दिलीप चंद्रकांत नावळे चालवित होता. कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version