पेण गणपतीवाडी येथे भीषण अपघात
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
इवॉन कार आणि ट्रकच्या धडकेत शेकाप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याची घटना पेण येथील गणपतीवाडी येथील चढावावर झाली. ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी काही काळ रस्ता रोखून धरला होता.
अपूर्ण स्थितीत असलेल्या गणपतीवाडी येथील चढावावर अनेक ठिकाणी मोठमोठे दगड पडले आहेत.
पावसामुळे रस्ता देखील खचला आहे. अनेकदा या गावातील ग्रामस्थांनी ठेकेदारासोबत संपर्क देखील केला. मात्र ठेकेदाराकडून याकडे दुर्लक्ष केले गेले. मंगळवारी पनवेलच्या दिशेने जाणार्या इवॉन कार एमएच 06 बीई 3242 ची ट्रकसोबत क्रमांक एमएच 12 आर एन 2393 समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात कार चालक सुरेश कदम राहणार गणपती वाडी यांचा जागीच मृत्यू झाला. गावातील नागरिकांनी काही काळ रस्ता बंद करुन ठेवत वाहतूक रोखून धरली होती. यावेळी पोलिस आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली. ठेकेदार आणि इंजिनिअरला घटनास्थळी बोलवून मयत व्यक्तीच्या कुटूंबाला नुकसान भरपाई देण्याची तसेच रस्त्याचे काम लवकर मार्गी लावण्याची मागणी यावेळी पोलिस निरीक्षक जितेंद्र पोळ यांच्याकडे केली. याप्रकरणाची नोंद पेण पोलिस ठाण्यात करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.