पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघात; होरपळून तीन जणांचा मृत्यू

| पुणे | वृत्तसंस्था |

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भोररवाडी तांबडे मळा (आंबेगाव) येथे आज (दि.17) सकाळी स्विफ्ट गाडी, टेम्पो व कंटेनरचा विचित्र अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट जागीच जळून खाक झाली असून तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.

मंचरपासून जवळच असणाऱ्या भोरवाडी परिसरात पुणे-नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा कंटेनर (जीजे-01-डब्लूबी-1737) बंद अवस्थेत उभा होता. या ठिकाणी सकाळी टेम्पो (एमएच-12-क्यूजी-3351) व स्विफ्ट (एमएच-14-डीटी-0295) यांच्यात जोरदार धडक झाली. धडक झाल्यानंतर टेम्पो पुढे जाऊन उभ्या असलेल्या कंटेनरला धडकला, तर स्विफ्ट गाडीने जागीच पेट घेतला. या अपघातात स्विफ्ट गाडी पूर्णतः जळून खाक झाली असून तीन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर स्विफ्ट चालक व टेम्पो चालक सुदैवाने बचावले. मृत तरुण हे खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

याबाबत अधिक चौकशी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे, पोलीस उपनिरीक्षक सोमेश्वर शेटे, पोलीस नाईक राजेंद्र हिले व नंदकुमार आढारी करत आहेत.

Exit mobile version