सुडकोलीत तरुणाचा अपघात की घात?

कॉरीतील पाण्यात बुडाल्याची घटना

|रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

सुडकोली येथील खडी उत्खननाच्या कॉरीत साचलेल्या पाण्यात बुडून मुंबईतील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 27) घडली. मात्र, तरुणाचा मृत्यू अपघाती नसून, घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे. त्यामुळे हा मृत्यू नेमका अपघात की घातपात, याचा उलगडा आता पोलीस तपासातून होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुडकोली येथील माळी यांच्या मालकीची खडी उत्खननाची कॉरी आहे. या कॉरीमध्ये सध्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. मुंबईतील वडाळा परिसरासह सुडकोली येथील काही तरुण सोमवारी कॉरीजवळ फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी वडाळा येथील एक तरुण कॉरीतील पाण्यात बुडाला.
घटनेनंतर त्याला तातडीने बेशुद्ध अवस्थेत अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, कॉरीतील पाण्यात बुडून तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद रेवदंडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, मृत्यूच्या परिस्थितीबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि त्यामागील परिस्थिती तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version