| महाड | प्रतिनिधी |
महाड-दापोली राज्य मार्गावर मे महिन्यापासून चालू झालेली अपघातांची मालिका जुलै महिना संपत आला तरीदेखील चालू आहे .बुधवारी (दि.23) दुपारी दोनच्या सुमारास मांडवकर कोंडजवळ पुणे फौजी-अंबवडे ही एसटी बस रस्त्यावरून घसरून झालेल्या अपघातात एसटी बसमधील चालक वाहकासहित आठ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. त्यांना महाडमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे फौजी अंबवडे (अहिरे कोंड) या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी आठ प्रवाशांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एसटी बसचालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर महिला वाहक हिच्या हाताला मोठ्या प्रमाणावर गंभीर दुखापत झाली असून, त्यांना शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी आपल्या खासगी वाहनातून महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यापैकी काही जखमींना महाशक्ती ॲम्ब्युलन्सचे अनिल चव्हाण यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून महाड ग्रामीण रुग्णालयात आणले.
यापुर्वी देखील एसटी महामंडळाच्या बसचा अपघात झाल्यानंतर मे महिन्यामध्ये निकृष्ट दर्जाचे डांबर वापरून रस्त्यावर सिलकोट मारून डांबरीकरण करण्याचा उद्योग करणाऱ्या एफएमसी कंट्रक्शन कंपनीविरोधात अद्यापी सार्वजनिक बांधकाम खाते का गुन्हा दाखल करीत नाही, असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. या अपघातामुळे गणेशोत्सव काळात या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय असल्याने ऐन गणेशोत्सवात या मार्गावर होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
या बसमधील जखमी प्रवाशांमध्ये चालक अविनाश लोखंडे (34), वाहक पौर्णिमा होन कडसे (46), आशाबाई जाधव (75), शारदा शेलार (67, सोहम पवार (17), सिमाब पेडेकर (18), सलवा पेडेकर (17), आराधना पवार (18), लहू पाते (55), विश्वजीत कदम (27) या जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एसटी महामंडळामार्फत किरकोळ जखमींना अर्थसहाय्य देऊन त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.







