। महाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील नांगलवाडी परिसरात भरधाव वेगाने जाणारा टेम्पो दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली.
महाड एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहिती वरुन अमोल अनंत रेशीम रा. मुठवली ता.महाड हा आपल्या ताब्यातील पिकअप टेम्पो क्रमांक MH 06 BG 4216 घेऊन पोलादपूर कडून मुंबईच्या दिशेने घेऊन जात होता. महामार्गावरील दुहेरी मार्गिका वाहतूक सुरू असताना देखील चुकीच्या दिशेने जात समोरून येणाऱ्या वाहनाला लागणारी धडक चुकवताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
यामुळे टेम्पो दुभाजकाला धडकून पलटी झाला. यामुळे टेम्पोमध्ये बसलेले सर्व प्रवासी बाहेर फेकले गेले. त्यामध्ये कुलवंती अशोक राऊत ( वय ६० . रा मुठवली ता महाड) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. सुहास मधुकर साळवी,अरुण लक्ष्मण चोरगे, ज्ञान नंदकुमार मेहता, नंदिनी नंदकुमार पालव, शीतल सुभाष राऊत, अमोल अनंत रेशीम ( सर्व राहणार मूठवली ता महाड) हे सहाजण जखमी झाले आहेत. सर्वांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.