तिन्ही सैन्यदल प्रमुख बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू

तामिळनाडूत लष्करी हेलिकॉप्टर कोसळले -14 ठार
अवघ्या देशभरात शोककळा,रावत यांच्या पत्नीचाही समावेश
केंद्राचे चौकशीचे आदेश
चेन्नई | वृत्तसंस्था |
भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमध्ये बुधवारी (8 डिसेंबर) दुपारी झालेल्या भीषण अपघातात देशाचे तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 14 जण ठार झालेले आहेत. बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानेे अवघा देश शोकाकूल झाला असून,राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू,पंतप्रधान नरेंद्र मोदी,संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आदींनी शोक प्रकट केला आहे.
तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. या हेलिकॉप्टरमधून सीडीएस बिपीन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग, गुरुसेवक सिंग, जितेंद्र कुमार,विवेक कुमार.बी. साई तेजा.हवालदार सतपाल आदी प्रवास करीत होते.
बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचं महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचं भाषण होतं. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते.त्यांना तिथून दिल्लीला जायचं होतं. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली.

अपघातानंतर जंगलाला आग
कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.
हे हेलिकॉप्टर एमआय-सीरिजचं असल्याचं सांगितलं जातं. एमआय -17, व्ही -5 या सीरिजचं हे हेलिकॉप्टर होतं. हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर आगाची भडका उडाला. त्यामुळे या दुर्घटनेत काही जण होरपळले आहेत. काही जणांचे मृतदेह मिळाले असून ते 80 टक्के भाजलेले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली आहे.

जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका जी यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला आहे. देशाने आपला एक शूर पुत्र गमावला आहे. मातृभूमीसाठी त्यांची चार दशके नि:स्वार्थ सेवा, शौर्य आणि पराक्रमाने चिन्हांकित होती. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाला श्रद्धांजली अर्पण करण्यात मी सहकारी नागरिकांमध्ये सामील आहे. शोकाकुल कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना.
-रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

जनरल बिपिन रावत हे एक अतुलनीय सैनिक होते. एक सच्चा देशभक्त. देशाचं लष्कर आणि सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. धोरणात्मक बाबींवर त्यांची मतं आणि दृष्टीकोन फार महत्त्वाचे असायचे. त्यांच्या निधनामुळे मला प्रचंड दु:ख झालंय. ओम शांती,
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सुरक्षेतील कुशल, अनुभवी आणि धडाडीचे नेतृत्व गमावणे हे देशाच्या दृष्टीने मोठे नुकसान आहे. एकंदर दुर्घटनाच सबंध देशासह आपल्या सर्वांचे मन विषण्ण करणारी आहे. अनेक आघाड्यांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणार्‍या संरक्षण दलाच्या प्रमुखांचा त्यांच्या सहकार्‍यांसमवेत असा मृत्यू होणं नियतीलाही मान्य असणार नाही.
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

लष्करप्रमुख आणि त्याच्यासोबत काही वरिष्ठ अधिकारी यांना या पद्धतीचा मृत्यू येणं. ही अतिशय चिंताजनक अशाप्रकारची गोष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे जे हेलिकॉप्टर वापरलं ते अतिशय उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर होतं. त्या हेलिकॉप्टरचा एकंदर दर्जा याबद्दल काही चर्चा होऊ शकत नाही. मात्र केवळ मशीन चांगलं असून चालत नाही, परिस्थिती देखील कशी आहे याकडे दुर्लक्ष करता येत नाही.
खा. शरद पवार

Exit mobile version