| अलिबाग | प्रतिनिधी |
तालुक्यातील कुरुळ येथील विवेक पाटील (27) या तरुणाचे शुक्रवारी (दि.7) रात्री अपघाती निधन झाले. त्याच्या निधनाने कुरुळ गावात शोककळा पसरली आहे. विवेक पाटील हा तरुण नेहुली येथे कामानिमित्त गेला होता. रात्री आठनंतर तो नेहूली येथून कुरुळकडे येत होता. दरम्यान पेण-अलिबाग मार्गावरील राऊतवाडी जवळ आल्यावर समोरून एक कार आली. कार आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये विवेक पाटील या तरुणाला गंभीर दुखापत झाली. त्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून तो अगोदरच मृत झाल्याचे घोषित केले. विवेक पाटीलच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी कुरुळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अलिबाग अर्बन बँकेचे संचालक अवधुत पाटील, ॲड. मनोज ओव्हाळ, योगेश घाडगे, सचिन पाटील, समीर पाटील, अनिल पाटील, कुरूळ येथील ग्रामस्थ, तरुण मंडळींनी उपस्थित राहून श्रध्दांजली अर्पण केली.






