| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चिंचोटी येथील तरुण दुचाकी अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर नवी मुंबई येथील रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तरुणाच्या अपघातील निधनाने चिंचोटी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संदेश गजानन भांजी असे या तरुणाचे नाव आहे. अलिबाग-रोहा मार्गावरील पुतूबाईचा पाडा येथील स्थानकाजवळ 5 एप्रिल रोजी सायंकाळी हा तरुण उभा होता. सव्वा सात वाजण्याच्या सुमारास अलिबागकडून खानावकडे जाणार्या एका दुचाकीची त्याला जोरदार धडक लागली. या धडकेत संदेश याच्या छातीला, डोक्यात व पोटाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला अधिक उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात पाठविण्यास सांगितले. त्यानुसार संदेश भांजी याला नवी मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू शनिवारी मध्यरात्री झाला. अलिबाग तालुक्यातील चिंचोटी येथील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
संदेश भांजी हा नोकरीनिमित्त कल्याण परिसरात राहत होता. गावी येत असताना त्याचा अपघात झाला होता. मात्र त्याचा दुर्देवी अपघातील मृत्यू झाल्याने चिंचोटी गावात दुखःचे डोंगर कोळसले आहे. संदेश भांजी याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे, अशी माहिती भांजी कुटूूंबियांकडून देण्यात आली आहे.