विशेष कृती समितीच्या कारभाराबाबत खातेदार आक्रमक

अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

| अलिबाग | प्रतिनिधी |

पेण अर्बन बँकप्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष कृती समिती बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप पेण अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीने केला आहे. याबाबत त्यांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना निवेदन देण्यात आले आहे. पेण अर्बन बँकेच्या एक लाख 98 हजार ठेवीदारांना न्याय मिळावा आणि घोटाळ्यातील अफरातफर झालेली 598 कोटी रुपयांची रक्कम वसूल करावी यासाठी याचिका दाखल करण्यात होती. यासंदर्भात दखल घेत उच्च न्यायालयाने 2015 मध्ये विशेष कृती समिती स्थापन करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली. त्यात पोलीस अधीक्षक, रिझर्व बँकेचे अधिकारी, ठेवीदार प्रतिनिधींचा समावेश आहे. समितीने दर महिन्याला बैठक घेऊन वसुलीचा अहवाल शासन व न्यायालयाला द्यावा असे आदेशात म्हटले आहे. या पध्दतीने सुरुवातीला योग्य कार्यवाही झाली. मात्र गेल्या वर्षभरापासून न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करण्यास समिती उदासीन ठरल्याचा आरोप ठेवीदारांनी केली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी जोरदार घोषणा देत आंदोलन केले. यावेळी नरेन जाधव, चिंतामण पाटील, दिलीप कडू, गजानन गायकर, शिरीष बिवरे, सुरेश वैद्य आदी ठेवीदार उपस्थित होते. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

न्यायालयाचे आदेश असूनदेखील वर्षभर बैठक घेण्यात आली नाही. प्रत्येक वेळेला ही बैठक टाळण्याचे काम केले आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन करीत आहोत.

नरेन जाधव, कार्याध्यक्ष
पेण अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समिती
Exit mobile version