पलकचा अचूक लक्ष्यवेध

10 मीटर एअर पिस्तूलमध्ये ब्राँझ; ऑलिंपिक कोटा मिळवला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताची आशियाई पदकविजेती खेळाडू पलक गुलिया हिने रिओ दी जेनेरियो येथे पार पडलेल्या पॅरिस ऑलिंपिक पात्रता फेरीतील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्राँझपदक पटकावले. या पदकासह तिने भारताला ऑलिंपिक कोटाही मिळवून दिला. भारताने पॅरिस ऑलिंपिकसाठी 20वा कोटा मिळवला आहे.

पलक गुलिया हिने अंतिम फेरीत 217.6 गुणांची कमाई करताना ब्राँझपदक जिंकले. अर्मेनियाच्या एलमिरा करापेटायन हिने सुवर्णपदकावर मोहर उमटवली. थायलंडच्या कामोनलाक सेंचा हिने रौप्यपदकाची कमाई केली. दरम्यान, याआधी झालेल्या पात्रता फेरीत पलक व सेन्यम या भारताच्या नेमबाजांना मोठे यश मिळाले नाही. त्यांना सहाव्या व सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते; पण मुख्य फेरीत पलक हिने उल्लेखनीय कामगिरी केली.

भारतीय नेमबाजांना पॅरिस ऑलिंपिकसाठी आणखी चार कोटा मिळवण्याची संधी असणार आहे. 19 एप्रिलपासून दोहा येथे ऑलिंपिक पात्रता फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शॉटगन प्रकारात भारतीय पुरुष व महिला खेळाडूंचा सहभाग असणार आहे. आतापर्यंत पिस्तूल व रायफल या प्रकारांमध्ये भारताच्या 16 नेमबाजांनी कोटा मिळवला आहे. दोहामधील स्पर्धा ही अखेरची पात्रता फेरी असणार आहे.

Exit mobile version