अचूक कर आकारणी ग्रामपंचायतीची जबाबदारी

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

ग्रामपंचायत हद्दीतील सर्व इमारती आणि अकृषीक वापराच्या जमिनी यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत कर आकारणी करणे आणि आकारणी केलेला कर वसूल करण्याबाबतच्या सूचना समीर वाठारकार, गटविकास अधिकारी पंचायत समिती, पनवेल यांनी सर्व ग्रामपंचायतींना केल्या आहेत.
ग्रामपंचायतींना कर आकारणीचा, कर वसुलीचा आणि त्याच्या वापराचा अधिकार प्राप्त असून हा घटनात्मक अधिकाराच्या आधारे राज्य कायद्याने प्रदान केलेला वैधानिक अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही तरतूदिन्वये ग्रामपंचायतीचा कर आकारणीचा अधिकार निष्कासित होत नाही. आणि कोणत्याही विशेष नियोजन प्राधिकरणाच्या स्थापनेमुळे ग्रामपंचायतीची कर आकारणी गैर लागू ठरत नाही. अकृषिक वापराच्या जमिनीबाबत ही ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या कर आकारणीमुळे दुबारकर, दुहेरीकर अशी बाब निर्माण होत नाही. गावाच्या हद्दीतील सर्व इमारतींवर आणि अकृषिक वापर सुरू असलेल्या जमिनीवर कर आकारणी करणे आणि कराची वसुली करणे ही ग्रामपंचायतची प्रमुख कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून अचूक कार्यवाही करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व इमारतींवर कर आकारणी करताना काही इमारती कर आकारणी प्रक्रिया दरम्यान वगळल्या गेल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच कर आकारणीनंतर वाढीव बांधकाम झाल्याचे ही आढळून येते. त्यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे वार्षिक मूल्य दर तक्त्‌‍यानुसार मिळकतीचे भांडवली मूल्यांकन काढून त्यावर ग्रामसभेमार्फत निश्चित करण्यात आलेल्या दराने कर आकारणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
ग्रामपंचायत हद्दीतील सर्व इमारती अकृषिक वापर सुरू असलेल्या जमिनी ह्या अधिकृत किंवा अनधिकृत/ अतिक्रमित असल्या तरी ग्रामपंचायतीने कर आकारणी करणे अनिवार्य आहे. कर आकारणी करताना घेतलेल्या नोंदीमुळे सदरची इमारत अनधिकृत/अतिक्रमित असल्यास ती अधिकृत होत नाही.

Exit mobile version