दापोली तिहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपीला बेड्या

कर्जबाजारी झाल्याने पैशांसाठी केले खून
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे नातू खोतवाडी येथे घरात राहणार्‍या तीन वयोवृद्ध महिलांचा खून करून अज्ञात इसमाने त्यांचे मृतदेह अर्धवट अवस्थेत जाळून 1 लाख 62 हजार 150 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. रत्नागिरी पोलिसांनी या प्रकरणाचा यशस्वी तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. कर्जबाजारी झाल्यामुळेच आरोपीने पैशाच्या मोहापोटी या तीन महिलांचा खून करून दागिने लंपास केल्याची कबुली दिली आहे.

14 जानेवारी रोजी वणौशी तर्फे नातू खोतवाडी येथील एका घरात तीन वयोवृध्द महिलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले. त्यामध्ये रुक्मीणी उर्फ इंदुबाई शांताराम पाटणे (78), पार्वती परबत पाटणे (101), सत्यवती परबत पाटणे (78) या तीन महिलांचे मृतदेह सापडले होते. त्यांच्या शरीरावरील दागिने चोरीला गेले होते.घटनास्थळी आरोपीने कोणताही सुगावा न सोडल्याने पोलिसांसमोर आरोपीला पकडणे हे एक आव्हान होते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. या तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी हेरला.

रामचंद्र वामन शिंदे, (53, रा. वणौशी) याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रत्येकवेळी वेगवेगळी माहिती दिली. त्याच्या संशयीत हालचाली पोलिसांनी टिपल्या.आपल्या कृत्याचे पितळ उघडे पडले आहे याची जाणीव होताच रामचंद्र शिंदे याने आपल्या वाईट कृत्याची पोलिसांसमोर कबुली दिली. कर्जबाजारी झाल्याने त्याला पैशांची गरज होती. या तीन महिला एकट्याच घरात आहेत. त्यांना मारुन चोरी करणे सहज शक्य असल्याने आपण खून आणि चोरी केल्याचे आरोपीने सांगितले. या गुन्ह्याचा तपास करताना अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह, पोलीस उपमहानिरिक्षक संजय मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी तपासकाम करणार्‍या सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version