| नेरळ | प्रतिनिधी |
कशेळे-मुरबाड रस्त्यालगत शुक्रवारी (दि.29) फेब्रुवारी अज्ञात तरुणाचे प्रेत सापडले होते. गळ्यावर चाकुचे वार आणि हातपाय बांधून निर्घृण हत्या झालेल्या अवस्थेत असलेल्या तरुणाचे वास्तव्य महाराष्ट्रीयन नसून, मूळचा ईशान्य भारतातील असावा, असा अंदाज येत होता. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्जत पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या गुन्ह्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकासह तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास चालू केला. पोलिसांपुढे सदर मयताचे ओळख पटविण्याचे आव्हान होते. यावेळी मयत इसमाचे फोटो प्राप्त करण्यात आले. या फोटोवरून सदरचा इसम हा आसाम, मिजोरम, सिक्कीम, नेपाळमधील रहिवासी असल्याबाबत दिसून येत होते. तसेच मयताचे अज्ञात आरोपींनी हात व पाय बांधण्यासाठी वापरलेल्या कपड्यावर काही खुणा होत्या.
त्याआधारे तपास करीत असताना सदर मयत इसम हा नेपाळ येथुन कामधंद्यानिमित्त पनवेल येथे आल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली व तो वेगवेगळ्या हॉटेलमध्ये कॅटरर्सचे काम रोजंदारीने करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. परंतु त्याचे नाव, राहण्याचे ठिकाण, पूर्ण मूळ गावचा पत्ता मिळून येथ नव्हता. परंतु, सदर पथकाने तपासादरम्यान मयत इसमाला ओळखणारा व त्यास वेगवेगळ्या हॉटेलमध्ये कॅटरर्सचे कामावर मजुरीने लावणारा लेबर कॉन्ट्रॅक्टर दिलीप धनसानी यास पनवेल येथून ताब्यात घेऊन चौकशी केली, परंतु तो उडवाउडवीची उत्तरे देत होता, त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानेच व त्याचे सहकारी आरोपी विजय रोळी वाघरी (38) रा. नवनाथ मंदिर, नवनगर झोपडपट्टी, स्टेशन रोड, पनवेल यांनी मिळून त्याचे पूर्ववैमनस्यातून मयताला दारू पाजून रिक्षाने नेरळच्या जंगलात प्रथम त्याचे हात पाठीमागे व दोन्ही पाय बांधून धारदार शस्ताने गळा कापून निर्घृण खून करून मृतदेह निर्जळ स्थळी जंगलात फेकून दिल्याचे सांगितले. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांनी वापरलेली रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे. सदर दोन आरोपी व रिक्षा पुढील तपासासाठी कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. खून झालेला मयत इसमाची ओळख नसताना त्याची ओळख पटवून तपासाचे कौशल्यपणाला लावून रायगड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि संदीप पोमण व पथकाने अहोरात्र मेहनत करून सदरचा गुन्हा उघड केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, सहायक फौजदार प्रसाद पाटील, हवालदार प्रतिक सावंत, राजेश पाटील, संदीप पाटील, यशवंत झेमसे, राकेश म्हात्रे, पोलीस नाईक सचिन वावेकर, अक्षय जगताप व सायबर पोलीस ठाण्यातील पोना तुषार घरत, पोना अक्षय पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.