| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील दहा आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यातील दोघांना सात वर्षे व इतरांना चार वर्षे अशी शिक्षा अलिबागमधील न्यायालयात शनिवारी सायंकाळी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. संतोष पवार यांनी काम पाहिले. या निकालाकडे अलिबाग तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते.
पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर पोयनाड परिसरातील काही स्थानिकांनी रेकी ठेवली होती. मुंबई परिसरातील सराईत दरोडोखोरांच्या मदतीने ऑगस्ट 2015 मध्ये सशस्त्र दरोडा टाकला होता. बुरखा घालून धारदार शस्त्र घेऊन त्यांनी दरोडा टाकून लाखोचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची सुत्रे वेगात हालविण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यास पोलिसांना यश आले. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला. आरोपींविरोधात मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा)अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. आरोपींविरोधात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते. अलिबागमधील न्यायालयात आरोपींवरील अंतिम सुनावणी झाली. त्यामध्ये दहा आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे ॲड. संतोष पवार यांनी काम पाहिले. 55 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर केलेले युक्तीवाद, फिर्यादी, साक्षीदारांची साक्ष, पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने दहा आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. दोन आरोपींना सात वर्षे आणि अन्य आरोपींना चार वर्षे शिक्षा सुनावल्याची माहिती ॲड. संतोष पवार यांनी दिली.







