| पनवेल | वार्ताहर |
कळंबोलीत राहणार्या तरुणाने 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर मागील वर्षभर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सागर विजयकुमार मिश्रा (25) असे या तरुणाचे नाव असून, कळंबोली पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
या घटनेतील आरोपी सागर मिश्रा कळंबोलीत, तर पीडित तरुणी तळोजा येथे राहण्यास आहे. वर्षभरापूर्वी या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री होऊन त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यादरम्यान सागर मिश्रा याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून कळंबोलीतील रोडपाली गाव येथील विशाल रो-हाऊसमध्ये नेऊन तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. यावेळी सागर मिश्रा याने शारीरिक संबंध करतानाचे फोटो काढले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये सागर मिश्रा याने सदर तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. पण, तरीही तिने त्याच्यापाठीमागे लग्नासाठी तगादा लावल्यानंतर सागर मिश्रा याने तिच्यासोबतचे लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच त्याच्यासोबतचे तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पीडित तरुणीने कळंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.