। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
बनावट नक्कल अभिलेखावर सहाय्यक अधीक्षक दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, पनवेल, रायगड आणि सहदिवाणी न्यायाधीश ‘क’ स्तर यांची खोटी सही करण्यात आली. तसेच न्यायालयाची खोटी मोहर उमटवून बनावट दस्तऐवज तयार करून ते वापरात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात 4 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी 23 डिसेंबर रोजी येथील आरोपी दीपक फड (रा. कामोठे, कनिष्ठ लिपिक) याला अटक केली.
गुप्ता यांनी मालमत्ते संदर्भात वारस दाखला मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. हा दिवाणी चौकशी अर्ज प्रकरण सह दिवाणी न्यायाधीश ‘क’ स्तर पनवेल यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत कोणतेही आदेश न्यायालयाने दिले नाहीत. मात्र नकलेच्या अर्जावरील आदेशावर दिवाणी न्यायाधीशांची सही असल्याचे दिसत असल्याने याबाबत शहानिशा केली असता आदेशावर असलेली सही त्यांची नसल्याचे समजून आले. त्यानंतर संगणकीय प्रणालीमधील सीआयएसमध्ये पडताळणी केली असता हे प्रकरण संगणकीय प्रणालीमधून डिलीट केल्याचे दिसून आले. त्यामुळे अज्ञात इसमाने नक्कल मिळण्याबाबतचा दस्तऐवज पडताळणी करता पिठासीन अधिकारी यांच्या खोट्या आदेशान्वये खोटे नोंद पुस्तक क्रमांक देऊन न्यायालयीन अभिलेख तयार केला आणि बनावट नक्कल अभिलेखावर न्यायाधीशांची खोटी सही केली. त्यामुळे पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पनवेल शहर पोलिसांनी चौकशी केली असता दीपक फड याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.