विनयभंगप्रकरणी आरोपीस तीन वर्षांचा कारावास

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आरोपी दिनानाथ मारुती पाटील यास 9 वर्षे 8 महिन्याच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मा. विशेष व अति सत्र न्यायाधीश-1, श्रीमती शईदा शेख यांनी आरोपीस पोक्सोंतर्गत दोषी पकडून 3 वर्षे शिक्षा व रक्कम रुपये 10,000/- दंड अशी शिक्षा ठोठावली. सदरचा गुन्हा हा दि. 13/02/2020 रोजी रात्री 20.00 ते 22.30 वाजण्याच्या सुमारास या प्रकरणातील साक्षीदार राजेश पांडुरंग पाटील रा. रामवाडी, समर्थनगर, ता. पेण यांचे घराचे गॅलरीत घडला असून, या प्रकरणातील पीडिता ही साक्षीदार शामकांत बाळकृष्ण म्हात्रे यांच्याकडे दि. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. ती एकटीच गॅलरीमध्ये असताना ती अल्पवयीन असल्याचे आरोपी दिनानाथ मारुती पाटील, वय 45 वर्षे, रा. रामवाडी समर्थनगर, ता. पेण राजेश पांडुरंग पाटील यांच्या चाळीत भाड्याने राहणारा, मूळ राहणार मसदबेडी, ता. पेण, जि. रायगड यांस माहीत असताना आरोपीने तिला पाठीमागून मिठी मारुन तिचा विनयभंग केला. यावर पीडितेच्या आईने पेण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असता, स.पो.नि. डी.बी. वेडे व त्यांच्या सहकार्‍यांनी जलदगतीने तपास पूर्ण केला. सदर खटल्यात अति. शासकीय अभियोक्ता स्मिता राजाराम धुमाळ -पाटील यांनी एकूण 7 साक्षीदार तपासले व मे. कोर्टासमोर सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद महत्त्वपूर्ण ठरला. यातील साक्षीदार आबासाहेब बालचंद मनार, सहाय्यक पर्यवेक्षक, पेण नगरपालिका, घटनास्थळ पंच सुरेश नागू सोनावणे, पीडित मुलगी तसेच तपासिक अंमलदार डी.बी. वेडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच पैरवी कर्मचारी महिला पोलीस शिपाई प्रियंका नागावकर, पो. हवालदर सचिन खैरनार, पो.शि. सिद्धेश पाटील, पो.शि. पी.व्ही. कारखिले यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

Exit mobile version