येरद गावातील हत्या प्रकरणाचा उलगडा
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील येरद गावात घडलेल्या खळबळजनक खून व चोरी प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी आरोपीला अवघ्या काही दिवसांत अटक केली आहे. माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या घरात अज्ञात आरोपीने घुसून त्यांने संगीता मनोहर मोकाशी (70) या वृद्ध महिलेला मारहाण करून सोन्याचे दागिने व मोबाईल लंपास केले आणि आरोपी पसार झाला. या मारहाणीमुळे महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते, तर रायगड पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान होते.
माणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 10 मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील येरद येथील संगीता मनोहर मोकाशी यांच्या घरात जबरी चोरीसाठी घुसलेल्या अज्ञात आरोपीने त्यांना निर्दय मारहाण करून त्यांच्या कानातील, गळ्यातील, हातातील सोन्याचे दागिने तसेच मोबाईल घेऊन तो पसार झाला. या मारहाणीत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले होते.
घटनेनंतर माणगाव पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. गुप्त बातमीदारांकडून माहिती गोळा करण्यात आली, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर आरोपीचे नाव उघड झाले. कल्पेश बबन जाधव (वय 22, वर्ष रा. येरद आदिवासीवाडी) असे आरोपीचे नाव असून तो रेशन आणण्यासाठी येरद गावात गेला होता. त्यावेळी त्यांने एका वृद्ध महिलेला ती घरात एकटी आहे हे पाहून घरात प्रवेश केला. पाणी मागण्याचा बहाणा करून त्याने तिच्या गळ्यातील सोन्याचे पोत खेचले. महिला प्रतिकार करेल या भीतीने आरोपीने तिचा गळा दाबून हालचाल थांबवली व बेन्टेक्सच्या चार बांगड्या व कर्णफुले दागिने, मोबाईल घेऊन पसार झाला होता.
पोलिसांनी दि. 29 ऑगस्ट रोजी आरोपीला शिताफीने अटक केली. त्याला दुसऱ्या दिवशी माणगाव येथील न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय अधिकारी शंकर काळे व पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे व त्यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या चिकाटी व वेगवान कारवाईमुळे गावकऱ्यांमध्ये दिलासा व पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे.







