। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील नाते येथील काही अंतरावर वाड्याजवळ एक 76 वर्षीय महिला मृत अवस्थेत आढळली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता आणला. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. मात्र, पुन्हा तपासाची चक्रे फिरवली व अवघ्या आठ तासात खुनाचा उलगडा झाला.
सविस्तर माहिती अशी की, लीलावती बलकवडे या शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी आपल्या शेतातील वाड्याजवळ काम करण्याकरिता गेल्या असता आरोपी याने त्यांचा पाठलाग करून. त्या एकट्या असल्याचा फायदा घेत त्यांच्या अंगावरचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये आरोपी याने त्यांचा गळा दाबून खून केला व अंगावरचे दागिने आणि मोबाईल घेऊन आरोपी पसार झाला. सुरुवातीला नातेवाईकांनी महाड ग्रामीण रुग्णालय येथे गोंधळ केला व हा आकस्मित मृत्यू नसून खून झाला आहे अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या टीमने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या आठ तासांमध्ये हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध लावला. सुरुवातीला आरोपी गुन्हा कबूल करण्यास नकार देत होता. मात्र, पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीने खुनाची कबुली दिली. आरोपी अभिजीत महेश अंबवले राहणार नाते याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महाड उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश तडवी या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.






