पुतणीला ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपीला ठोकल्या बेड्या
| पनवेल | प्रतिनिधी |
आपल्या 16 वर्षीय पुतणीला जबरदस्तीने स्वतःच्या कब्जात ठेवून तिच्या गळ्याला कोयता लावून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी त्याठिकाणी पोलीस पथक पोहोचले असता त्यांच्यावर कुऱ्हाड व कोयत्याने हल्ला करून दोघांना जखमी करणाऱ्या, एका खून प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
आरोपी सोबन बाबुलाल महातो (35) रा. मंगला निवासी, पनवेल याने बुधवारी रात्री 11.30 च्या दरम्यान त्याच्या बिल्डिंगमधील दुसऱ्या रूमचे लॉक तोडून कुऱ्हाड व कोयता अशा घातक शस्त्रांसह जबरदस्तीने रुममध्ये प्रवेश करून ही पूर्ण बिल्डिंग माझी आहे, मला जर कोणी अडवले तर सर्वांना ठार मारून टाकेन, असे जोरजोरात आरडाओरडा केला. याबाबतची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच त्यांचे पथक त्याला ताब्यात घेण्यासठी घटनास्थळी गेले असता त्याने या पथकावर कुऱ्हाड व कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात पोना सम्राट डाकी, पोना रवींद्र पारधी यांना गंभीर दुखापत केली.
यावेळी वपोनि नितीन ठाकरे, पोनी शाकिर पटेल व पथकाने त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना बाहेर येण्यास सांगितले असता त्याने त्याचे आई, वडील, भाऊ व भावाची तीन मुले यांना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला, तसेच त्याने त्याची 16 वर्षीय पुतणी निकिता महातो हिला जबरदस्तीने स्वतःच्या कब्जात ठेवून तिच्या गळ्याला कोयता लावून तिला ठार मारण्याची धमकी देत असताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण आत प्रवेश करून त्याला घातक शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 चे प्रशांत मोहिते, सहा. पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले आदींनी तातडीने पोलीस ठाण्यात पोहोचून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे.







